चिरतरुण 'दूरदर्शन'
साधेपणा आणि आशय समृद्धी यांना, सदैव आपल्या सोबत घेऊन आपल्या वयाची साठ वर्षं पूर्ण करणार्या आपल्या, 'दूरदर्शन' ला माझ्याकडून सदाहरित शुभेच्छा आणि अभिनंदन सुद्धा ! दूरदर्शनची सुरवात, त्याचा इतिहास, प्रगतीचे टप्पे, त्यात आलेलं यश-अपयश, आवश्यक असे समकालीन बदल आणि आजचा दिवस याबद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे. तरीही त्याची मांडणी मला या लेखात करून देता आली नाही याबाबत क्षमस्व ! पण, दूरदर्शन आणि मी यांचं नातं मात्र मला आवर्जून व्यक्त करावसं वाटतं.
ज्या दिवसापासून टीव्ही नावाचं यंत्र मला समजू लागलं तेव्हापासून दूरदर्शन म्हणजेच टीव्ही असा माझा समज होऊन गेला. आजही माझ्या मनात दूरदर्शनला तितकच आश्वस्त असं स्थान आहे. अभिमान, शक्तिमान, शका-लका बूम-बूम, राजा-रंचो, रंगोली, सुराग, अलीफ लैला, रिपोर्टर, चित्रहार, महाभारत,रामायण, जय हनुमान, ओम नमः शिवाय यांसारख्या कार्यक्रमांना मी न चुकता भेट देत होतो. त्यातली पात्रं माझ्या अंगात सतत भिनत राहायची आणि मीही त्यांच्यासारखं अनुकरण नेहमीच करीत होतो.
सुरवातीला अंटीना संच आणि त्यानंतर पत्र्याची मोठी डिश यांच्या मदतीने मी, नॅशनल (डीडी १), मेट्रो (डीडी २) आणि सह्याद्रि या वाहिन्यांचा चाहता होऊन गेलो. तसच बातम्या, आंखो देखी, चंदग्रहण, सूर्यग्रहण यांचाही लाभ घेता आला. माझ्या जास्तीत-जास्त आवडीचा खेळ म्हणजे, क्रिकेट. यासाठीही मला दूरदर्शननं नॅशनल आणि डीडी स्पोर्ट्स यांमधून मनोरंजन करून दिलं. माझ्या मानसिक आणि शारीरिक विकासाची सलामी दूरदर्शननंच पार पाडली आहे. याबाबत मी भाग्यवान आहे.
माझ्या घरात जेव्हा दूरदर्शनची डी.टी.एच. सेवा सुरू केली तेव्हापासून तर भारतातल्या सर्व राज्यांच्या संस्कृतीचा मला आढावा घेता यायला लागला. एक परिपूर्णतेचा आत्मविश्वास प्राप्त व्हायला सुरवात झाली. केबल नेटवर्कच्या काळातही दूरदर्शनची आस्वादता जराही कमी ठरलेली नव्हती. आजही खासगी डिशची सेवा वापरत असताना दूरदर्शनवर मी तितकच भरभरून प्रेम करतोय.
आज दूरदर्शनला काही अडचणी, प्रश्न, तडजोड, स्पर्धा यांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे त्याच्या अस्तित्वाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. तसच इतर वाहिन्या, प्रसार माध्यमं यामुळे दूरदर्शन कुठेतरी दुर्लक्षित होतय. पण, हेही तितकच सत्य आहे की, नैसर्गिक आणि भौतिक यांमध्ये उचित अरोग्यदायी असं संतुलन साधून देण्यात दूरदर्शनचा हात आजही कुणी धरू शकलेलं नाहीये. वास्तवता हे जरी काळाचं अपत्य असलं तरी शाश्वत आणि आशाश्वत या मूल्यांबाबत जाण असणं महत्वाचं असतं. आशाश्वतता ही, त्यातलं ज्ञान केवळ, 'ठावूक' असण्याप्रत ठीक आहे. पण, तारतम्यताच एक जोखीम ठरावी इतकी मर्यादा पार होऊ देणं योग्य असेल का ?
संतुलित समकालिक आरोग्यदायी आयुष्य लाभणार असेल तर त्यासाठी आपण राष्ट्र नागरिकांनी पाऊलं टाकायला हवीत. 'दूरदर्शन' चं संगोपन सतत सचेतन ठेवायचं असेल तर आपल्या देशाखातर प्रत्येक व्यक्तीनं निर्व्याज आणि फायद्याच्या बाबतीत निरपेक्ष मनाची बांधणी आपल्या स्वतासाठी आवर्जून करायला हवी. निसर्ग आणि भौतिक यांमध्ये मनुष्याला काळानुसार उचित संतुलन साधण्यात, 'दूरदर्शन' अग्रेसर आहे यात शंका नाहीच. मग या संतुलनासाठी प्रत्येकानं त्या दिशेनं तयारी दर्शविण्यात दुर्लक्ष का करावं ? मला वाटतं की खालील उपायांचा वापर आपल्या, 'दूरदर्शन' ला सदैव चिरतरुण ठेवू शकतो.
१) ज्या कला निर्मात्यांच्या असंख्य कला आहेत त्यापैकी काही कला ,'दूरदर्शन' वरून सुद्धा प्रदर्शित करण्यात याव्यात.
२) समाजाचा प्रत्यक्ष सहभाग राहील असे कार्यक्रम ,दूरदर्शन' ने सुरू करावेत.
३) 'माय गव्हर्नमेंट' या संकेत स्थळाप्रमाणे कार्यक्रमांची संरचना असावी. यात सरकारने लक्ष द्यायला हरकत नसावी. म्हणजे संपूर्ण राष्ट्रभर प्रसार होत राहील आणि आवडीने, उत्साहाने इतर वाहिन्यांप्रमाणेच, 'दूरदर्शन' सुद्धा आस्वादता येईल.
अनमोल सुतार (कवि अन्नू)
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
Comments
Post a Comment