'द व्हिलन' - 'तो' ही आणि 'ती' ही.
आचार्य अत्रे यांची
आठवण विस्मरणात ठेवणं तसं म्हणायला गेलं तर फारच अशक्य आहे.पण, तरीही गेल्या
आठवड्यात त्यांची आठवण नेहमीपेक्षा जरा जास्तच अधोरेखित झाली. त्यांनी त्या काळात
त्यांच्या नाटकातून साकारलेला, ‘लखोबा लोखंडे’ आज प्रत्यक्षात अनुभवता आला.
यामागेही बरेच, ‘लखोबा लोखंडे’ होऊन गेले असतील. मला ठावूक नसेल. पण, यापुढे तसे,
‘लखोबा लोखंडे’ यदा-कदाचित कधी तयार झाले तरी आपण त्यांना प्रतिसाद देवून आपली फसगत
करून घ्यायला नको. इतकीच एक अभिलाषा.
सहजपणे
जगत असताना नकळत आपण एखाद्या गोष्टीत, व्यक्तीत स्वताला गुंफत राहतो. खरेपणा असेल
तर ठीक अन्यथा, एके दिवशी तीच गोष्ट किंवा व्यक्ती, ‘व्हिलन’ असल्याचं आपल्या
लक्षात येतं ; आणि तेव्हापासून आपली गणनाही, ‘व्हिलन’ म्हणूनच केली जात आहे.
याचाही प्रत्यंतर येवू लागतो. मग मनात विचार येतो की, सुरवातीपासूनच सतर्कता,
सावधपणा, बुद्धिचातुर्य घेवून वागलो असतो तर बरं झालं असतं. कधी-कधी असंही वाटतं
की, आता त्या, ‘व्हिलन’ ला चांगलीच अद्दल घडवली पाहिजे. पण, काही केल्या ते आपल्या
हाती नसतं. किंबहुना, तशी परिस्थितीच तयार झालेली असते. मग कायदा जे काही करेल
त्यावरच आपल्याला समाधान मानावं लागतं. काही असेही असतात कि सारं काही लक्षात
येवूनही गप्प राहतात. त्यांच्या गोपनीयतेचा भाग वाटत असेल हा त्यांना. पण, अशा
गप्प राहण्यानं खरेपणा समोर येणारच नाही. हे लक्षात घ्यायला हवं. तरीही, कुणीतरी
एक दिवस त्या, ‘व्हिलन’ चं पितळ उघडं करतोच. तेव्हा त्या पितळ उघडं करणाऱ्याचं नाव
गोपनीयता लेवून राहतं हेही समजून घ्यायला हवं. त्यामुळे पीडीतांनी तक्रार करायला
जराही कचरता कामा नये. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आपल्या मनाची, शरीराची झालेली
प्रतारणा किंवा अपवित्रता. तर याला आपणही तितकेच जबाबदार ठरलेलो असतो जितका तो, ‘व्हिलन’
कारणीभूत झालेला असतो.
अनैतिक ठरलो म्हणून
नैराश्येच्या गर्तेत जावून घुसमटत आयुष्य व्यतीत करण्यापेक्षा गोपनीयता बाळगून
त्या,’ व्हिलन’ विरोधात तक्रार करणं केव्हाही श्रेयस्कर आहे. जरी प्रतारणा किंवा
अपवित्रता झाली म्हणून शरीरावर फारसा परिणाम होणार नसेल तर मनावरही जखमा करून
घ्यायची काहीच गरज नाहीये. इतरांचं प्रबोधन करून दिलं हीच बाब आपल्याला पुन्हा
निर्मळ करू शकते. यात शंकाच नाही. ज्याच्याशी आपले शारीरिक व्यवहार होणार आहेत
केवळ त्यालाच आपली फसगत ठावूक करून दिली आणि त्यानं ती स्वीकारली तर आपण आपल्याला
पुन्हा नैतिक, पवित्र समजायला काहीच हरकत नाहीये. अशानं आपण विश्वासू आणि असंशयित
म्हणून नक्कीच गणले जावू शकतो आणि सुंदर आयुष्य व्यतीत करू शकतो.
मी तरी इंटरनेटची व्याख्या, ‘एक अर्धसत्य’ अशीच करून ठेवली आहे. मग याचा
अर्थ काय लावायचा ? हे
ज्याचं-त्यानं ठरवावं. तर याच इंटरनेटच्या सहाय्याने तो, ‘लखोबा लोखंडे’ आपली
विकृत खेळी साकार करीत आला ; आणि त्याला , ‘व्हिलन’ ठरवायला मात्र, ‘पूर्णसत्य’
असलेला प्रत्यक्षपणाच उपयोगी ठरला. किती विरोधाभास म्हणावा हा, ‘अर्धसत्य’ आणि,
‘पूर्णसत्यातला’ ! तरीही आपल्या मनुष्य प्राण्याला हा फरक अजूनही लक्षात कसा येत
नाही ? अजूनही आपला मानव फसगतीची शिकार का ठरतो ?
तर पस्तीस ते चाळीस वयाच्या त्या , ‘लखोबा लोखंडे’ नं स्वता विवाहित असूनही
दोन विवाहविषयक संकेतस्थळांवर आपलं खातं सुरु केलं होतं. उत्कृष्ट प्रोफाईलसह तो, कधी आपण अविवाहित आहोत असं तर कधी, लवकरच आपला घटस्फोट होण्याच्या मार्गावर आहे असं भासवून प्रौढ कुमारिका
आणि घटस्फोटीत महिलांना आपल्याकडे आकर्षित करीत आला. पीडीतांची संख्या किती आहे ?
हे नक्की माहिती नाही. पण, त्याच्या संपर्कात आलेल्या एकूण महिलांची संख्या तीन
हजार दहा आहे. तर तक्रार नोंद करणाऱ्या महिलांची संख्या सध्यातरी तीस आहे. हि
संख्या आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एका
तरुणी सोबत तर त्यानं आपला साखरपुडा सुद्धा अगदी जल्लोषात उरकला होता. पण, त्याचं
खरं बिंब त्याच्या पहिल्या पत्नीनं उघडकीस आणलं. (घटस्फोट झालेला नव्हता) त्यानंतर
त्यानं त्या तीस महिलांसोबतच आणखीन किती जणींना फसवलय ? हे अद्याप समोर आलेलं
नाहीये.त्याची ही खेळी २०१४ पासून सुरु होती. पण, आता जून २०२० च्या शेवटच्या
आठवड्यात त्याच्याकडून फसगत झालेल्या एका वकील तरुणीनं मात्र त्याच्या खेळीचा शेवट
केलाय. आता तो जेरबंद जरी झाला असला तरी त्यानं केलेल्या विकृत खेळीचा इतिहास
काहीही केलं तरी नष्ट करता येणार नाहीये. हे मनात आणायचं नाही म्हंटलं तरी त्यानं
केलेलं कारस्थान सर्वाना मान्य करावच लागणारेय.
इंटरनेट
हे माध्यम वापरून व्हाटस अप आणि फेसबुक या उपमाध्यमांना सोबत घेवून तो, पिडीतांचं
मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण करीत आला. त्याला तशी चटकच लागली होती. त्या वकील
पिडीत तरुणीनं स्वताची फसगत करून घेतली ती, ‘अर्धसत्या’च्या माध्यमातून आणि हीच
फसगत लक्षात येण्यासाठी तिच्या मदतीला तिला, ‘पूर्णसत्याला’च घ्यावं लागलं.किती
विरोधाभास आहे हा ? पण, तरीही बरीच मंडळी, ‘पूर्णसत्या’ पेक्षा ‘अर्धसत्याच्या’ नादाला जरा जास्तच लागतात. असं
का ? याबाबत आपण साऱ्यांनीच जागरूक व्हायला हवंय आता.
आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा की, हे घडत कसं ? आपली गरज,
आपण आपल्या गरजेशी संबंधित असणाऱ्यांकडून पूर्ण करायचा यत्न करतो. हे ठीक आहे. त्या
काळात त्या व्यक्तीशी आपले मानसिक, आर्थिक व्यवहार होतात. हेही योग्य आहे. ओळख
होते, मैत्री होते, प्रेमही होतं. इतपत सारचं चांगलं आहे. पण, लग्न होण्याआधीच
किंवा लग्न होऊन सुद्धा अनैतिक शारीरिक संबंध कसे काय व्यवहार्य ठरतात ? एखाद्या
अज्ञानी माणसाच्या बाबतीत हे घडत असेल तर ठीक आहे. पण, वकील, प्राध्यापक, डॉक्टर,
इंजिनियर, पोलीस इथपर्यंत पदप्राप्ती करणाऱ्या मनुष्याकडून तशी फसगत कशी काय होऊ
शकते ? नैसर्गिक ज्ञानाला भौतिक ज्ञानाची जोड असेल तर आयुष्य एक विज्ञान म्हणून
किंवा एक सर्वसामान्य म्हणून साकार होत राहतं. मग तो, ‘लखोबा’ आणि त्या पिडीता
वरील पदाप्रत झेप घेणारे होते. तरीही फसगतीची घटना कशी काय साकार झाली ? उद्विपक
काहीही असो. भावना प्रक्षेपित होण्याआधी वैज्ञानिक आणि शाश्वत-जीवन मुल्यांचा ज्ञानझरा वाहायला पाहिजे. हे तत्व
त्यांना अवगत नव्हतं का ? आपण ज्याच्याशी संबंधित होणार त्याचा भूतकाळ, वर्तमानकाळ
आणि त्याची भविष्याबाबत तरतूद आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे. पण, तरीही त्या पिडीतांना
आणि त्या, ‘लखोबा’ ला आपली जोपासणूक करणं का जमलं नाही ? त्यांना आपल्या शरीराचं
नियंत्रण का राखता आलं नाही ? कुठं गेले त्यांच्यावरचे संस्कार ? कुठं गेली आपली
संस्कृती ? यावर विचार व्हायला हवा.
आपल्याकडे अशीही तौलनिकता आढळते ती म्हणजे, शहरं
नेहमीच विकसित असतात तर ग्रामीण भाग अप्रगत किंवा विकसनशीलतेचा केवळ प्रयत्न
करणारी असतात. मग विकसित ठिकाणी फसगतीची प्रकरणं कशी काय जन्माला येतात ? ग्रामीण
भागात तर वैयक्तिकते आधी सामाजिकतेला प्रथम स्थान दिलं जातं. म्हणूनच शहरांच्या तुलनेत
ग्रामीण भाग सुसंस्कृत आहेत. विकास कमी असला तरी नुकसान अथवा पडझड शक्यतो होत
नाही. मग शहरात विकास जास्त असला तरी वैयक्तिकतेमुळे सामजिकतेला धक्का बसावा असं
अनुचित का घडतं ? त्यामुळे, ‘विकसित’ हे बिरूद शहरांना कशासाठी ? आयुष्य कसंही,
कितीही आणि काहीही असलं तरी जीवनमुल्ये, नैसर्गिकता, विज्ञान यांचा विसर पडता कामा
नये. हे ध्यानात रुजवून ठेवणं महत्वाचं आहे.
आणखीन एक
महत्वाची गोष्ट अशी की, त्या, ‘लखोबा’ नं अशाच युवतींना, महिलांना लक्ष्य केलं की
ज्या आपल्या कुटुंबापासून, समाजापासून अलिप्त होत्या/आहेत. आपलं आयुष्य जर
जीवनमुल्ये, शाश्वतमुल्ये नैसर्गिकता आणि विज्ञान यांनी परिपूर्ण असेल तर आपल्याला
एकटं राहायला, जगायला काहीच हरकत नाही.
विरोधाभासिक
अनुरूपतेकडं आकर्षित होणं स्वाभाविक असलं तरी अपवित्र आणि अनैतिक, व्हायला आपल्या
मनानं कधीही तयार होता कामा नये.
फसगत करणारी
कुणीही व्यक्ती, ‘व्हिलन’ म्हणून ओळखली जाते. मग ज्याची फसगत होते तीही व्यक्ती, ‘व्हिलन’
म्हणूनच सिद्ध होऊन जाते. तात्पर्य हेच की, अर्धसत्याचा आधार असो किंवा
प्रत्यक्षता असलेल्या पूर्णसत्याचा. आपलं आयुष्य कधीही विछिन्न होणार नाही याची
आपण काळजी घ्यायला हवी. आतापर्यंत तीस पिडीतांनी तक्रार दाखल केलेली असली तरी आणखीन
कितीतरी पिडीता अशा आहेत की ज्यांनी
अद्यापही त्या, ‘लखोबा’ विरोधात तक्रार दाखल केलेली नाहीये.
त्या
तक्रार दाखल करतील किंवा करणार नाहीत. पण, त्यांना त्यांच्या आयुष्यासाठी एक सच्चा
जोडीदार जेव्हा मिळेल तेव्हा त्या स्वता आपल्या जोडीदारासाठी एक, ‘व्हिलन’च ठरतील.
जोपर्यंत त्या, आपल्या जोडीदारापाशी स्वताच्या घडलेल्या फसगतीचा खुलासा करू शकणार
नाहीत. पण, काय माहिती ? त्यांना लाभणारा जोडीदार सुद्धा, ‘विलन’ च असेल तर ? तर
हा प्रश्न अनुत्तरीतच राहील. जोपर्यंत नीतिमत्ता म्हणजे काय ? याचं उत्तर
दोघांपैकी कुणीही आपल्या आयुष्यात रुजवून घेत नाही. इतरांशी प्रामाणिक होण्याआधी
अगोदर आपण स्वताशी एकनिष्ठ होणं महत्वाचं आहे. अन्यथा, आपल्या जगात, ‘विलन’ वाढत
राहतील आणि, ‘अर्धसत्य’ हेच, ‘पूर्णसत्य’ वाटायला लागेल. की ज्यामुळे प्रत्यक्षपणा
कायमचा नामशेष होऊन जाईल.
अनमोल सुतार (अन्नू)
शिवाजी विद्यापीठ,
कोल्हापूर. ©
Comments
Post a Comment