अंधार जेव्हा होई प्रकाशाचा वैरी

 © Anmol Sutar-Annu.

                                                      अंधार आणि प्रकाश खरं तर दोन्हीही परस्परांचे कट्टर विरोधाभास. तसच परस्परां‍साठी तितकेच अनुरूप सुद्धा. परस्परावलंबित्वाचा सिद्धांत अगदी दोघांनाही लागू होऊन राहतो. आता त्याचं सविस्तर स्पष्टीकरण मी या लेखात देत नाही. क्षमस्व ! अनुरूपता जिथं नांदते तिथं विरोधाभास सुद्धा आपली भूमिका अगदी निक्षून बजावतात. त्याशिवाय, संतुलन म्हणजे काय ? याची व्याख्या आपण जाणू शकणार नाही.  पण, बऱ्याच वेळा एखादी गोष्ट शक्य असूनही आपण, त्या गोष्टीला मुद्दाम तर कधी नकळतपणे अशक्य करून ठेवतो आणि होणार्‍या नुकसानीला फार कमी वेळा स्वत:ला जबाबदार धरतो. तसच जास्तीत-जास्त त्या गोष्टीच्या व्यवस्थेलाच कारणीभूत ठरवतो. अशानं सुविधा असून त्यांचा काहीच उपयोग राहत नाही. ज्ञानाच्या अभावामुळे प्रगतीचा आणि विकासाचा आलेख तटस्थच ठरतो किंवा थोड्या प्रमाणात अधोगतीकडेही झुकतो. तशीच सवय लागली तर पुढची पिढी धडपडण्याची शक्यता निर्माण होऊन जाते. आळस आणि अज्ञानता सोडून उत्साही मेंदूला नियोजनाची आणि समकाळासोबत व्यतीत व्हायची गोष्ट शिकवली पाहिजेय आता. कारण, “आहे त्यातच पाहूयात होतंय का ?” ही संकुचित अवस्था आपण सोडायलाच तयार नाहीये. त्यामुळे काय होतं ? तर आपल्यातला आळस वाढू लागतो आणि ज्ञान संपादन करण्याची क्षमता आपल्याला तटस्थ राहायला भाग पाडते. मग शेवटी काय ? एक तर माघार किंवा पुन्हा प्रयत्न. नाहीतर थेट विकल्पांचीच बदली. त्यामुळे आपलं मन काही वेळा रागाच्या स्वाधीन होऊन जातं. संबंधित म्हणून जर कुणी व्यक्ती असेल तर नात्यात कलह साकारले जातात. बऱ्याच व्यक्तींबाबत असंही घडतंय कि, मर्यादित गोष्टींना त्या व्यक्ती अमर्यादित समजून राहतात आणि खरी जाणीव झाली कि मात्र त्यांना आकलन व्हायला सुरवात होते कि, सीमा म्हणजे नेमकं काय ? जाणकार पुढचं पाऊल चालायला घेतात. पण, काही व्यक्ती खरी जाणीव होऊन सुद्धा जणू, “काहीच फरक पडत नाही...” असा आविर्भाव घेऊन तसेच जगायला लागतात. मग वर सांगितल्याप्रमाणं माघार, पुन्हा प्रयत्न किंवा थेट विकल्पांचीच बदली. 

                                                                  आता आपण या तत्वातली उदाहरणं पाहूयात. पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या एका मोटार प्रशिक्षण शाळेत सतत घडणारा हा प्रसंग. शिकाऊ परवाना प्राप्तीसाठी तालुका आणि जिल्हा पातळीवर मर्यादित आरक्षण उपलब्ध असल्यामुळे शिकाऊ चालकांची आणि प्रशिक्षकाची या शाळेत नेहमीच तारांबळ उडत आलेय. नोंदणी करतेवेळी, “डोक्यावरचं प्रेशर सतत वाढतं....” अशी तक्रार तो प्रशिक्षक आजवर नेहमीच करीत आलाय.

                                                                     एका विशिष्ट वेळी सुरु झालेली नोंदणी प्रक्रिया केवळ दोनच मिनिटात बंद होऊन जाते. अर्थात, दोन मिनिटात सगळ्याच नोंदी आरक्षित होऊन जातात. तालुका स्तरावर त्यांची मर्यादा असते केवळ शंभर. तर जिल्हा स्तरावर मात्र निवांतपणे आरक्षित करण्याची शक्यता अगदी खात्रीने देता येते. याचा अर्थ, तालुका पातळीवर शिकाऊ चालक मर्यादेपेक्षा जास्तच तयार होताहेत. ज्याला जिल्हा पातळीवर जायला परवडतं तो निवांत राहणं पसंत करतो. पण, “तालुका पातळीवर मिळालच पाहिजे....” असा आग्रह धरणारे मात्र माघार घेतात किंवा पुन्हा प्रयत्न करायला राजी होतात. यातले बरेचसे विकल्प बदलायला सुद्धा तयार असतात.

                                                           आरक्षण मर्यादा वाढवायला हवीच, ती जबाबदारी सरकारची. पण, तरीही त्या शाळेत हे असं का घडतं ? त्या शाळेनं आजवर साडे-तीन हजार चालक परिपक्व केलेले असूनही त्या शाळेत केवळ एकच संगणक आहे. तसच त्या संगणक चालकाची संख्या सुद्धा एकच ठेवलेली आहे. त्या संगणकाचं इंटरनेट खालच्या दर्जाचं असून ती शाळा अशा कोपर्‍यात आहे कि, जिथं मोबाईल नेटवर्क सुद्धा खालच्या दर्जाला पकडून ठेवतं. ते काही केल्या सोडतच नाही. त्यामुळे हि शाळा नोंदणी करतेवेळी शंभर पैकी केवळ तीन किंवा चार आरक्षणं घेण्यातच यशस्वी ठरते. म्हणून, शाळेत नोंदणी करण्यासाठी आलेल्या पंधरा-वीस शिकाऊ चालकांना माघारी जावं लागतं ; आणि परवाना प्राप्तीपासून वंचित राहावं लागतं. मग प्रशिक्षण घेऊन काय उपयोग ? अर्थात, संपूर्ण प्रक्रियेसह प्रशिक्षणाची शुल्क रक्कमही जोरदार आकारली जाते. मग तरीही, अशा अडचणी का तयार होतात ? अशानं कौशल्य आणि त्या प्रशिक्षकाची ख्याती यांना तडा जाणार नाही कशावरून ? विकल्पच नसतील तर असे कितीवेळा माघार घेत राहणार ? किंवा किती वेळा पुन्हा-पुन्हा प्रयत्न करून पाहणार ? आरक्षण मर्यादा, संगणक संख्या, संगणक चालक संख्या वाढवता येईल. तसच इंटरनेटचा दर्जा, मोबाईल नेटवर्कचा दर्जा यांमध्ये प्रकारानुरूप सुधारणा नक्कीच करता येईल. पण, उत्सुक्तेपेक्षा, सज्जतेपेक्षा अंधकारी तक्रारधारकच वाढीस लागलेत. मग यातूनच बोगस कारभाराची शक्यताही नाकारता येत नाही.  

                                                       तसंही मोबाईलपेक्षा वैयक्तिकरित्या सुद्धा स्वतंत्र संगणक घेता येईल. पण, तिथंही नकाराची भूमिका अधोरेखित होत राहतेय. जास्तीत-जास्त नागरिक मोबाईलमध्येच इंटरनेटला आपलं सर्वस्व करून टाकतात. पण, मोबाईल इंटरनेटला संगणक इंटरनेटच्या तुलनेत खूपच मर्यादा आहेत आणि त्या असणारच आहेत. अगदी कायमसाठी. मग भले मोबाईलचा आकार जरी वाढवला तरी फारसा फरक पडणार नाहीये. आपल्या मोबाईल वापरकर्त्यांनी हे तत्व जर समजून घेतलं तर अंधार आपलं अस्तित्व मुद्दामहून किंवा नकळतपणे सुद्धा प्रकाशात मिरवायला येणार नाही.

                                                                  बऱ्याच मोबाईल धारकांचं असं मत आहे कि, “आमची वैयक्तिक गोपनीय माहिती कोण चोरणार आहे ?” ; “आणि जरी चोरली तरी इतका काय फरक पडणारेय ?” हि अशी वृत्ती वाढीला लागून पैसे कसे वाचतील आणि कमीत-कमी पैशात जास्त सुविधा कशा प्राप्त करता येतील ? मग भले बोगसता का असेना लाभार्थी होऊन जावं. या अशा विचारांना सुद्धा जन्माला घातलं जातंय. तंत्रज्ञानातही आजकाल गुन्हेगारी प्रवृत्ती चांगलीच बळावत चाललीय. जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. हे लक्षात घ्यायला हवंय. तोटे कमी करून फायदे प्रगतीशील कसे राहतील ? याकडे लक्ष दिलं गेलं तर प्रकाश असताना अंधार आपलं अस्तित्व विनाकारण गडद करू शकणार नाहीये.

                                                        आता यापुढचं उदाहरण पाहूयात. स्वता सरकारी नोकरी करून कैक होतकरू तरुणांना उद्योगाला लावणाऱ्या एका इसमाची उडणारी तारांबळ सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे. याचं मासिक उत्पन्न आहे लाखात, पाच मजली इमारत आणि तीन महागडी वाहनं तसच, शेती, दुमजली पर्यायी घर, घरात नवनवीन वस्तू, महागडे मोबाईल, आहार-विहार सुद्धा महागडा. हे इतकं सगळं असून सुद्धा त्याला आपल्या मुलांचे शालेय ऑनलाईन फॉर्म जमा करण्यासाठी नेट कॅफे शोधत दरवर्षी वणवण फिरावं लागतंय. नेट कॅफेंची ठिकाणं सतत बदलल्यामुळे सुद्धा त्याच्यावर ही अशी वेळ येत असेल कदाचित. पण, हे कारण ऐकून त्याचं वर्तन हास्यास्पदच ठरेल. नाही का ?

                                                               यानंतर आणखीन एक उदाहरण पाहूयात. माझा एक मित्र नकळतपणे एका संध्याकाळी साधारण, सातच्या दरम्यान घरी परत फिरण्याच्या अडचणीत सापडला.खिशात दहा रुपयांपेक्षा जास्त रक्कम नव्हती. घरचं अंतर दहा-बारा किलोमीटर दूर. मोबाईलचा रिचार्जही आजच समाप्त. अर्थात, इनकमिंग सुरु आउटगोइंग बंद. करणार काय ? दुसऱ्या कुणाकडे तरी मदत मागण्यापेक्षा त्यानं खिशातल्या दहा रुपयांचा वापर रिचार्जसाठी करायचं ठरवलं. त्याप्रमाणं तो एका दुकानात गेला. त्याच्या मागणीवर दुकानदारानं त्याला विनोदीपणाचं खळखळतं हास्य दिलं आणि सांगितलं, “दहाचा रिचार्ज आजकाल कुणीच करीत नाही....त्यामुळे सॉरी, नाही होणार रिचार्ज....” हे बोलणं ऐकून तो दुसऱ्या दुकानात गेला. तर तिथं त्याला असं उत्तर मिळालं, “पन्नास रुपयांच्या पुढे रिचार्ज मिळतील, दहाचा मिळणार नाही....कारण, आम्हाला तो परवडत नाही....” झालं, पुन्हा निराश मनानं तो मित्र तिसऱ्या दुकानात पोहचला. तर तिथं त्याची विनंती दर्शक मागणी पूर्ण झाली. पण, कशी ? त्या दुकानदारानं त्याला तीन वेळा विचारलं, “दहाचा रिचार्ज ? दहाचा रिचार्ज ? दहाचा रिचार्ज ?” तेही प्रश्नांकित चेहरा करून. शेवटी हताश होऊन मित्रानं, “होय काका, दहाचा रिचार्ज करा....” असं सांगितल्यावर त्या दुकानदारानं अखेर दहाचा रिचार्ज केला. त्यानंतर एका तासाभरात माझा तो मित्र घरून न्यायला आलेल्या त्याच्या नातेवाईकासोबत आपल्या घरी सुखरूप दाखल झाला. तात्पर्य काय ? तर, दहा रुपयांचं मूल्य इतकं खाली कसं काय आलंय ? सुविधा, प्रगती यांमध्ये आम्ही दिवसागणिक विजय मिळवीत आहोत असा दावा करणारे आपले काही नागरिक वर नमूद केलेल्या उदाहरणांमध्ये तर सपशेल लोटांगण घालताहेत ; आणि या तिसऱ्या उदाहरणाकडे जर पाहिलं तर असं वाटावं कि, आपण अतिश्रीमंत देशात वास्तव्य करतोय कि काय ? किती विरोधाभास म्हणायचा हा ?

                                                                 दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी मला माझे प्रिय शिक्षक नुकतेच त्यांच्या घरी आलेले दिसले. मी, “काय सर ? शाळेतून आलात कि काय ?” सर, “हो रे....शाळा सुरु झाली आजपासून....” मी,” ऑनलाईन सिस्टीम बंद आता ?” सर, “कशाचं ते ऑनलाईन आणि काय !” मी, “ का हो ? काय झालं ?” सर,”समोरासमोर शिकवणं आणि ऑनलाईन शिकवणं जमीन-अस्मानचा फरक आहे बघ....गरीब विद्यार्थ्यांकडे कुठाय मोबाईल ? कुठाय संगणक ? आणि असला तरी त्याला ते इंटरनेट परवडणार आहे का ?” मी, “हो तेही बरोबरच आहे....पण, एकंदरीत काय अनुभव आला ऑनलाईनचा ?” सर थोडे उदास,मिश्कील झाले आणि हसतच म्हणाले, “काही नाही, ऑनलाईन सिस्टीम फ्लॉप ठरली....पूर्णपणे फ्लॉप....तंत्रज्ञानाच्या प्रगतीला मानलं आणि हवासा फायदा जरी झाला असला तरी त्यात हवीशी ताकद मिळालीच नाही....मन एकाग्र होऊ शकलं नाही....विद्यार्थ्यांचंही आणि आम्हा शिक्षकांचंही.... मनासारखं-मनापासून काहीच करता आलं नाही....पण, नको असलेल्या गोष्टींचा क्षणिक फायदा कुणी करून घेतला असेल तर त्याच्या भविष्यात त्याला तोटेच-तोटे अनुभवायला लागणार....हे नक्की....” एवढं बोलून सरांनी माझा निरोप घेतला. पण, सरांचं शेवटचं वाक्य ऐकून माझं मन मात्र हेलावून गेलं. काळजीचा एक विचित्र गंध एकसारखा दरवळायला लागला. हे असं का झालं असेल ? त्याचं स्पष्टीकरण मी आता देत नाही. त्याचा गर्भित असा अर्थ एव्हाना तुम्हाला कळला असेलच.

                                                      अंधार-प्रकाशाचं वैज्ञानिक नातं नाकारून त्या दोघानांही किंवा दोघांपैकी कुणा एकाला जरी आपण आभासीपणा अथवा मुद्दामपणा बहाल करीत राहिलो तर सरांचं शेवटचं वाक्य आपली भीती आणखीन वाढवीत नेणार यात शंका नाही. आळस, अज्ञान, फसवणूक, पराभव, अशक्तपणा, खोट्या समजुती, बेफिकीरता, निकृष्टता, हाव, स्वार्थ, गुन्हेगारी, अनुत्साही, निरसता, अनिश्चितता, अव्यवस्थापन, नाईलाज, विघातक तौलनिकता, अमानवता, खोटा आविर्भाव, गरिबीकडे दुर्लक्ष करून अवाजवी श्रीमंतीकडे विनाअभ्यास वाटचाल, अविश्वास, तुच्छता, परंपरांना विनाकारण हद्दपार करून विघातक आधुनिकतेकडे कल, सर्वसमभावांकडे दुर्लक्ष, कुपोषित कृती, मनाचा ऱ्हास, मोह, अपरिपक्वता, नुकसान आणि काळजीची विचित्र भीती या साऱ्या अवस्था सुद्धा आपलं वजन वाढवीत नेतील आणि संपूर्ण पृथ्वीलाच डळमळीत करून ठेवतील. मग सावरायला कोण येणार ? ब्रम्हांड ?  

©अनमोल सुतार - अन्नू,

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. 

Comments

Popular posts from this blog

'द व्हिलन' - 'तो' ही आणि 'ती' ही.