'एका अनर्थाचा गुंता' - It's Complicated ?

                                                         

                                    ‘इट्स कॉम्प्लीकेटेड’ असं शीर्षक देवून नुकतीच एक नवीन संकल्पना मनात तयार होत असताना त्याच संकल्पनेवर आधारित, ‘न सुटणारा गुंता’ करणाऱ्या अनर्थाची एक घटना या पृथ्वीतलावर प्रत्यक्षात साकार झाली. अशा कितीतरी घटना या जगात क्षणाक्षणाला जन्म घेत असतात. काहींचा कसातरी उचित निकाल लावला जातो. तर, काही घटना तर्क-वितर्काच्या मैदानात खेळत राहण्यातच धन्यता मानतात. काही घटनांचा निकाल लावताच येत नाही. मग उरतो एकच पर्याय तो म्हणजे त्या घटनांना तर्क-वितर्काच्या मैदानात खेळायला लावणं. तेही अगदी आयुष्यभर. काही घटनांवर तर चक्क पांघरूनही घातलं जातं. तर काही घटना जगासमोर येतच नाहीत. पांघरून घातलेल्या आणि समोर न येणाऱ्या घटनांमध्ये प्रामुख्याने दोन विरोधाभास असतात. एक तर मनाचं मोठेपण संपूर्ण घटनेलाच क्षमा करून टाकतं ; आणि त्या उलट त्याची विरोधिका म्हणून मनाचा संकुचितपणा, घाबरलेपणा त्या अवघ्या घटनेला सोशिकतेचं रूप बहाल करून, आहे तसच व्यतीत व्हायचा मार्ग धरतो. पण, अशानं होतं काय ? क्षमा केल्यानं घडलेल्या घटनेची किंमत खालावली जाते आणि त्यामुळे तशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. योग्य निकाल लावला गेला नाही तर हे चक्र तसच सुरु राहतं. सोशिकतेनं व्यतीत करीत राहिल्यानं सुद्धा अगदी तसेच परिणाम घडू शकतात. “चलता है” या वाक्यानं तशा घटनांवर फार बोलणं टाळलं जातं आणि त्या घटनांना हद्दपार, दुर्लक्षित करून केवळ चार दिवसांच्याच स्मृतीमध्ये जागा दिली जाते. अशानं मनाचं आरोग्यही ढासळत राहतं. पण, मन कसं असतं ? हेच ठावूक नसल्यामुळे त्याचं आरोग्य कसं आहे ? हे कोण जाणत बसणारेय ?

                                            या आपल्या जगात जितकी मनं जगताहेत तितक्या प्रवृत्ती आपण अनुभवत आलोय. जगाची संस्कृती जपणारा आपला समाज पूर्णतः त्यात यशस्वी होत नाहीये हे सत्य आपल्यातुनच पुन्हा-पुन्हा अधोरेखित होतंय. याला कारण हेच आहे. ते म्हणजे, नैसर्गिक आणि भौतिक यांमध्ये असणारं असंतुलन. परिस्थितीला हाताळण्यात आपली मानवी बुद्धी दिवसेंदिवस कमी पडण्यात वाकबगार ठरतेय. याला निर्माण झालेल्या किंबहुना केलेल्या सुविधाही तितक्याच जबाबदार आहेत. या जगाच्या प्रगतीसाठी जसा मानव कारणीभूत आहे. तसाच तो जगाच्या अधोगतीसाठी सुद्धा तितकाच जबाबदार होत चाललाय. प्रगतीचं प्रमाण जास्त आणि अधोगतीचं प्रमाण कमी आहे म्हणून ठीकाय. पण, यापुढे अधोगतीचं  प्रमाण जर वाढत राहिलं तर मात्र संपूर्ण जगाचा विनाश थांबविनं  फार कठीण होऊन जाणारेय.

                                           चुका घडणार नाहीत असं म्हणनं चुकीचंच आहे. पण, चुका घडून गेल्यावर, त्यावर प्रबोधन किती केलं जातं ? त्यातून शिकवणूक काय मिळते ? आधी आणि नंतर अभ्यास का केला जात नाही ? प्रयोग का होत नाहीत ? तर्क-वितर्क, अंदाज, शक्यता यांना का स्थान दिलं जात नाही ? “कारण, त्यासाठी आम्हाला वेळ नाहीये....” हे बोलणं योग्य आहे का ? आपण हे असं बोलून आपण आपल्या स्वताला जगवतोय कि आपल्या कामाला जगवतोय ? वेळ नाहीये, जलदता हवीय. अशा अजून कितीशा वेगाची अभिलाषा आहे आपल्या मानवाला ? या प्रश्नाचं उत्तर द्यायला याच आपल्या मानवाला बहुदा जमेल कि नाही ? हाही एक प्रश्नच आहे. 

                                         तर घडलेली ती घटना या साऱ्यांचच एक द्योत्तक आहे. निकाल लावायचा कसा ? याचं उत्तर कुठेच दिसेना झालयं. क्षमा केली काय किंवा सोशिकता अमलात आणली काय. शेवटी, जगणं फार कठीण असणारेय. त्यापेक्षा त्या घटनेला तर्क-वितर्क यांच्या मैदानात खेळवत राहणं. हेच, आपल्या न्यायदेवतेला योग्य वाटणारेय. निकाल लावणारी बुद्धी कधी जन्माला येतेय ? याचीच वाट बघावी लागणारेय जणू तिला. पण, तशी बुद्धी येणं अशक्यच आहे. म्हणूनच, “बघुयात, पुढं काय होतयं ?” हे वाक्य त्या घटनेतल्या संबंधितांना किमान मरणाच्या दारात तरी घेवून जाणार नाहीये. तसंही त्यांना मरण आलं किंवा त्यांनी स्वता आणलं तरी त्यातून त्यांना तिळमात्र सुद्धा फरक पडणार नाहीये. त्यामुळे त्यांचं काहीही झालं किंवा त्यांना काहीही केलं तरी त्यांच्या आयुष्याचं संक्रमण अगदी व्यर्थ ठरणारेय. त्याचं आयुष्य कितीही व्यतीत होत राहिलं तरी त्यांना लाभलेलं तुटलेपण पुन्हा कधीही जुळणार नाहीये. मग उरणार काय ? तर तटस्थतेत आनंद ‘मानणारं’ एकटेपण. 

                                         आता आपण अनर्थाचा गुंता करणाऱ्या त्या घटनेबद्दल बोलू. एका सोळा वर्षाच्या मुलीचं, स्वताला अनुरूप अशा वयाच्या एका मुलासोबत प्रेमप्रकरण सुरु झालं होतं. सततच्या होणाऱ्या भेटीमध्ये त्यांच्यात शारीरिक संबंधाची भेट सुद्धा पार पडून गेली होती. पण, पुढं काय घडलं कुणास ठावूक ? दोघंही परस्परांविषयी अतोनात तिरस्कार करायला लागले आणि एके दिवशी एकमेकांपासून कायमसाठी दूर झाले. साधारण एक वर्षाचा कालावधी लाभला असेल त्यांच्या या नात्याला. त्यानंतर त्याच मुलीचं दुसऱ्या एका वयोनुरूप मुलाशी प्रेमप्रकरण सुरु झालं. काही दिवसांनी या दोघांतही शारीरिक संबंध साकारले गेले. पण, यांना आपलं नातं लग्नापर्यंत नेण्यात अपयश आलं आणि फक्त चार महिन्यातच हे नातंही तुटून गेलं. यासाठी कारण होतं, या मुलीचं, तिच्या कुटुंबीयांनी एका तिसऱ्याच मुलासोबत ठरवलेलं लग्न.

                                         झालं !अखेर तिचं लग्न या तिसरया मुलासोबत पार पडलं. उपरोक्त वधू-वर मधुचंद्रासाठी दूरवर फिरून सुद्धा आले. पण, पाचव्या-सहाव्या दिवशी या वधूमुलीचं पोट दुखायला लागलं. वरानं तिची तक्रार ऐकुन बहुदा विचार केला असावा कि, “मधुचंद्र पार पडून चार-पाच दिवसच झालेत. मग हि, आत्ताच पोटदुखीची तक्रार का करत असेल ?” पहिल्यांदा मात्र वाईट संशय येणं स्वाभाविकच आहे. म्हणून तिला घेवून तो जवळच्याच एका दवाखान्यात गेला. तिथं दोघांनाही कळलं कि, ती आता तीन महिन्यांची गर्भवती आहे. हे समजल्यावर त्या वराची अवस्था काय झाली असेल हे त्यालाच ठावूक. 

                                                                                         पुढं हे दुख आणि स्वता केलेली-स्वताची झालेली फसवणूक असह्य झाल्यामुळे त्या गर्भवती वधूनं, “माझ्यावर बलात्कार झालाय.” अशी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिला, “आरोपी कोण ?” अशी विचारणा केल्यावर तिनं त्या पहिल्या मुलाचं नाव सांगितलं. दबाव आणि भीतीपोटी त्या मुलानंही तिचा आरोप मान्य केला. पण, बलात्कार म्हणून नव्हे तर प्रेमप्रकरणातून झालेले शारीरिक संबध म्हणून. तसच, “तिच्या गर्भात वाढणारं बाळ माझं नाहीये....कारण आमचं प्रेमप्रकरण बंद होऊन आता पाच महिने उलटून गेलेत....आणि आता तर हि तीन महिन्यांची गर्भवती आहे....” अशी माहितीही त्यानं समोर आणली. या कलाटणीमुळे पोलिसांनी आणखीन सखोल वैद्यकीय तपासणी करण्याची योजना आखली. तिच्या समंतीनुसार हि तपासणी पार पडल्यावर हे निष्पन्न झालं कि, तिच्या गर्भात वाढणारं बाळ कुण्या तिऱ्हाईताचच आहे. हे सिद्ध झाल्यावर मात्र त्या वधूमुलीनं आपल्या दुसऱ्या प्रेमप्रकरणाची कबुली दिली आणि त्या मुलावरही बलात्काराचा आरोप केला. पण त्या मुलानंही, “तिच्या सोबत आपलं प्रेमप्रकरण जुळलं होतं.”अशी  माहिती दिली.त्यानुसार त्या दुसऱ्या मुलाची तपासणी केल्यावर जे यायचं होतं तेच समोर आलं आणि जाहीर झालं कि, तिच्या गर्भात वाढणारं बाळ हे या दुसऱ्या मुलाचंच आहे. 

                                                                                                  तर अशा या घटनेची हि गाडी अशीच इथवर थांबली नाही. पोलिसांनी या गर्भवती मुलीच्या नवऱ्याला, आई-वडिलांना आणि सासू-सासऱ्यांना सुद्धा अटक केली. कारण काय ? तर या गर्भवती मुलीला अजूनही अठरा वर्ष पूर्ण नसताना आधीच तिचं लग्न का लावलं गेलं ? तसच पुढं आणखीन चौकशी केली असता हेही उघडकीस आलं कि, झालेल्या लग्नाची नोंदणीसुद्धा करण्यात आलेली नाहीये.         

                                                    झालं ! आता हा अनर्थमयी गुंता सोडवणार कोण ? आणि तोही कसा ? आपल्या या जगात ज्या-ज्या घटना घडतात त्यांच्या निर्मितीआधी त्यांच्या निर्मितीचं कारण म्हणून त्या घटनेशी संबंधित एखादी कृती त्या घटनेसाठी एक उद्विपक ठरलेली असते. माणूसच निर्मिती करतो आणि माणूसच उपभोगत राहतो. पण, याच माणसाला चांगलं-वाईट यांतला फरक का कळू नये ? तारतम्य साधण्यात त्याच्या मनाला,मेंदूला तसं नियंत्रण का मिळवता येत नाही ? त्या घटनेतील व्यक्तींमध्ये प्रेम होणं, शारीरिक संबंध घडणं यासाठी नक्कीच तसा उद्विपक असणारेय. पण, परस्परांत आकर्षण साकारताना ते परिपक्व आहे कि बालिश ? हे कसं त्यांना कळलं नाही ? लग्नानंतर आणि अपत्यप्राप्तीसाठी करावयाची गोष्ट लग्नाआधीच एक गंमत, लालसा, वासना म्हणून का साकार व्हायला हवी ? बरं, हे असो ! असं आपण मान्य केलं तर मग परस्परांतल्या एकनिष्ठत्वाला भलं मोठ्ठ असं भगदाड का पडतं ? मतभिन्नता असणारच. पण, जिथं सहिष्णुताच नांदायला धजावत नाही ते कोणतं नातं म्हणावं लागेल ? निसर्गानं लाख किमया करून दिली तरी विधायक विज्ञानाला विसरायचं नसतं. हे वाक्य आपला मानव का समजून घेत नाही ? 

                                                       

                                          त्यानंतरची गोष्ट हि कि, परस्परांमध्ये विवाहपूर्व साकारलेलं प्रेम, घडून आलेले शारीरिक संबंध यांचं गणित संबंधितांना विवाह संपन्नतेप्रत का नेता येत नाही ? पालकांसोबतचा संवाद का हरवला जातोय ? ; आणि म्हणूनच जराही चुकीची चाहूल झाली कि शंका उत्पन्न व्हायला जराही वेळ लागत नाहीये. मधला संवाद हरवण्यासाठी पाल्यासोबतच पालकही तितकेच जबाबदार आहेत. हे विसरता कामा नये. संयमाची, शांततेची, धीराची जागा उतावीळतेनं घेतेलेय. हे आता मान्य करायला हवंय. संशय, अविश्वास, भीती, अबोलपणा, यांनाही नकळत विनाकारण स्थान दिलं जातंय. या नंतर मग आपसूकच सत्ता, नकार, मुद्दामपणा, फसवणूक, खोटेपणा यांचाही जन्म होऊन जातोय. “आता आपलं काही खरं नाही. सारंच काही आपल्या अंगावर पडणार आणि लपलेलं पितळ उघडकीस येणार.” अशी धारणा झाली कि, अविचारी वृत्ती काहीही करीत सुटते. मग आरोप, प्रत्यारोप, पुरावे, यांचा खेळ सुरु होतो. विधायक विज्ञान समोर उभं ठाकलं कि, लपलेलं सत्य आपोआपच उलगडलं जातं. प्रगतीकडे वाटचाल करणारा आपला भारत अजूनही खेडोपाड्यात मात्र बेकायदेशीर, निरक्षरच ठरतोय. संपूर्ण देशाच्या तुलनेत याचं प्रमाण कमी असलं म्हणून काय झालं ? जनगणनेमध्ये, मतदार यादीमध्ये तर साऱ्यांचाच समावेश असतो. हे विसरता कामा नये. पण, जनगणना दर दहा वर्षांनी आणि मतदान दर पाच वर्षांनी असल्यामुळे साऱ्यांनाच त्याचा विसर पडत असावा.  

                                                                                                           या घटनेप्रमाणं भविष्यात असे कितीतरी अनर्थमयी गुंते घडत जातील. यात शंका नाही आणि त्यांची शक्यताही नाकारता येत नाही. या घटनेला हुबेहूब जुळणारी संकल्पना माझ्या मनात त्या घटनेआधीच रुजत चालली होती. तिला साहित्यात परावर्तीत करून सावधतेसाठी संपूर्ण जगासमोर मला ती प्रदर्शित सुद्धा करावयाची होती. यथावकाश ती जगासमोर येईलच. त्यात काही अडचण नाही. पण, वाईट कल्पना आणि त्याचाच प्रत्यक्षपणा जर एकमेकांच्या समीप येत असतील तर काळजी वाटायला सुरवात होणार. हे काही नवल नसणारेय. यांची संख्या उत्तरोत्तर वाढत गेली तर अल्पावधीतच जगाचा विनाश व्हायला कुणीही अटकाव घालू शकणार नाहीये. हे जग जितकं सोप्पं आहे तितकच अवघडसुद्धा आहे. हे लक्षात घ्यायला हवंय. 

                                     या घटनेप्रमाणं असे कितीतरी अनर्थ आपल्या या जगात घडून गेले असतील किंवा घडत असतील अथवा घडून येतील. हा उपरोक्त अनर्थ उघडकीस आला आहे. पण, जे अनर्थ जगासमोर येतच नाहीत आणि येणारच नाहीत. त्यांचं काय ? त्यांमधलं सत्य ज्यांना ठावूक आहे किंवा असणार आहे ते आपल्या मनाचं आरोग्य दिवसेंदिवस बिघडवत नेणार. हे मात्र नक्की आहे. दुसरा पर्याय हा कि, या अशा घटनांना क्षमा करून टाकणं. पण, क्षमा करून टाकण्याइतका आपला प्रत्येक मानव मनानं कधीही मोठ्ठा होऊ शकणार नाहीये. त्यानंतर तिसरा पर्याय म्हणजे, अशा घटनांचा निकाल लावायचा. पण, हेही न सुटणारं एक महाकाय असं कोडंच ठरणारेय. त्यामुळे उरलं काय ? “बघुयात काय होतंय ?” हे वाक्य आणि तटस्थतेत आनंद, ‘मानणारं’ दिन दुबळं असं, ‘एकटेपण’.              

- अनमोल सुतार  (अन्नू)

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. ©️

Comments

Popular posts from this blog

जागतिक स्वच्छता दिन २ ० २ ५ .

'द व्हिलन' - 'तो' ही आणि 'ती' ही.

अंधार जेव्हा होई प्रकाशाचा वैरी