अप्रगत वाटा आणि विश्रांती.
काळ कोणताही असो. आपल्या
मानवानं स्वताच्या आयुष्यात नेहमीच एक सुंदर असं तारतम्य ठेवण्याचा सतत प्रयत्न
केलाय. त्याच्या परंपरांचा वारसा आजही अगदी अबाधितपणे आपलं वर्चस्व सिद्ध करून
दाखवतोय. भूतकाळाला तर त्यानं असं जतन करून ठेवलंय की, आजही तेव्हाचा अनुभव आपल्या
सर्वाना मार्गदर्शक ठरतोय. यातूनच तर आपला सध्याचा वर्तमान व्यतीत होतोय आणि याच
वर्तमानातून आपण भविष्याकडे वाटचाल करीत राहणार आहोत. नवे-नवे शोध लागताहेत त्याच
प्रमानं संशोधन करण्यातही आपण मागे नाहीये. अगदी कुणीही आपल्याला, ‘माणूस’ म्हणून
संबोधावं यासाठी आपण सदैव धडपडतोय. काही वेळा आपल्या हातून कित्येक चुका घडतात. त्या
चुकांचं आपल्याला प्रायश्चित सुद्धा भोगावं लागतं ; आणि आयुष्य जिवंत राहिलं तर
त्यातून आपण आपलं प्रबोधन करायलाही नेहमीच तयार असतो. मग चुकांची जन्मकहाणी समजायला
फार वेळ लागत नाही. काय कमी ? काय जास्त ? हे समीकरण आपण लगेच ओळखतो. अंदाज
बांधण्यातही आपण पटाईत आहोत. अंदाज चुकला तर त्यानंतरचं जे काही घडणारेय
त्याबाबतही आपण दक्ष असतो. पण, ह्या वर्णनानुसार वागणारी आपली मानवी संख्या फारच
विरळ आहे. याची खंत वाटते. आणि, म्हणूनच ‘मी’ च्या सर्वस्वासाठी, ‘मुद्दामपणा’ला
आपल्यातून वजा न करणाऱ्यांची मानवी संख्या मात्र तुलनेनं जास्त आहे असं म्हणायला
काहीही हरकत नाहीये.
‘कोरोना’ नावाचा
विषाणू, आता पाच-सहा महिने झाले तरीही आपलं साम्राज्य तसूभरही कमी होऊ देत नाहीये.
वातावरणानुसार तो आपलं रूप बदलू लागलाय. संपूर्ण जगावर असलेलं त्याचं सावट आजही
तितक्याच ताकदीनं तग धरून आहे. बाधित आणि मृत्युमुखी यांची संख्याही दिवसेंदिवस
वाढत चाललेय. संपूर्ण जगाचा वेग त्या विषाणूमुळे प्रमाणापेक्षा कमी झालाय. ज्या
गोष्टी पूर्णता नैसर्गिक आहेत त्यांवर फारसा परिणाम नाहीये. (उदा. जंगलं, हवा,
पाणी, मृदा इ.) मात्र यांव्यतिरिक्त ज्या काही गोष्टी आहेत (उदा.मनुष्य,
उद्योगधंदे, वाहतूक इ.) यांना मात्र मोठ्या आणि विचित्र परिणामांना सामोरं जावं
लागतंय. थोडक्यात काय ? तर, या विषाणूनं अवघ्या जगासमोर एक नवा अध्याय मांडलाय. मग
त्या अध्यायाची प्रचीती प्रत्येकानं आपापल्या कल्पनेप्रमाणं करून घ्यावी. काही
चांगलं घडलंय तर काही वाईट. हे मात्र नक्की आहे. उपचारांसाठी विविध औषधांचा वापर
होतोय. पण, तोही केवळ प्रयोग म्हणून. ‘कोरोना’ वर विजय मिळविणारं शाश्वत असं औषध
अजून तरी सिद्ध झालेलं नाहीये. अविकसित, विकसित आणि विकसनशील या तिन्ही प्रकारातली
राष्ट्रं औषधाच्या शोधासाठी अहोरात्र झटताहेत. औषधाचा शोध लागणार हे नक्की आहे. त्याचप्रमाणं हेही नक्कीच सिद्ध झालंय
कि, आपण अजूनही अप्रगत वाटांवरूनच चालत आहोत.राष्ट्रा-राष्ट्रांत तुलना होत
असल्यामुळेच विकसित-अविकसित या शब्दांचा उदय झालाय. तसं पाहायला गेलं तर सारीच
राष्ट्रे विकसनशील आहेत.
‘कोरोना’ पासून बचाव
करणं हे सध्या तरी आपल्याच हातात आहे. वैज्ञानिक नियम पाळणं आणि आपलं शरीर
जास्तीत-जास्त आरोग्यदायी कसं राहील ? यासाठी तत्पर असणं हेच आता त्या विषाणूपासून
बचावात्मक औषध म्हणायची वेळ आलेय आपल्यावर.
‘कोरोना’ च्या पार्शवभूमीवर आणखीन एक चर्चा रंगायला लागलेय. ती म्हणजे अशी
की, कुणी म्हणतंय, “हा विषाणू नैसर्गिक आहे”. कुणी असं ठरवलंय की, हा विषाणू
अपघातातून तयार झालाय. तर काही जण असं मत व्यक्त करताहेत की, हा जैविक युद्धाचा
आणि घातपाताचा प्रयत्न आहे. उत्तर काहीही असेल. पण, आपल्याला या तिन्ही
मुद्द्यांमधून शिकून घेण्यासारखं खूप काही आहे. कारण, उपरोक्त तिन्ही
मुद्द्यांमध्ये आपण अप्रगत म्हणूनच सिद्ध झालोय.
हा विषाणू नैसर्गिक
आहे असा मुद्दा आपण घेतला तर, उद्या काय घडणारेय ? याचा अंदाज बांधण्यापासून ते येत्या
काही वर्षात अमुक असे बदल अपेक्षित आहेत. इथपर्यंत सारं काही ठरवणारे या
विषाणूबाबत मात्र बेफिकीर कसे काय ठरले ? हा विषाणू आपल्या पृथ्वीवर अचानकपणे येतो
काय आणि अवघ्या जगाचं जास्तीत-जास्त नुकसान करतो काय. याचा अर्थ, आपण आपल्या
नैसर्गिकतेबाबत अजूनही अप्रगतच आहोत. हे मान्य करायला हवंय आता. शोध-संशोधन याबाबत
असलेला आपला अभ्यास आजही फिका ठरतोय. आपल्या परिसंस्थेमध्ये घडणाऱ्या बदलांबाबत
आपण अजूनही बेफिकीर म्हणूनच सिद्ध होतोय. तिन्ही काळांचा अभ्यास करून दक्ष, जागरूक
राहण्यासाठी आपली बुद्धी अजूनही तितकीशी सक्षम होत नाहीये. अनुभव, सतर्कता आणि
उपाययोजना यांत आपण आज सपशेल लोटांगण घालू लागलोय.
दुसरा मुद्दा असा की,
कदाचित अपघातातून या विषाणूचा जन्म झाला असावा असं काहींचं मत आहे. हा मुद्दाही
आपली भूमिका निभावू पाहतोय. ह्या बद्दल बोलायचं म्हंटल तर यातही आपण अज्ञानीच
ठरलोय. “अपघात घडणार नाही” असं म्हणनं केवळ अशक्यच आहे. अपघात घडणारच. पण,
त्यानंतर काय होणार ? नुकसान झालं तर कोणत्या उपाययोजना अमलात येतील ? फायदा होणार
असेल तर काय केलं पाहिजे ? हे सगळं एक अभ्यास म्हणून ज्ञात असणं अनिवार्य आहे. पण,
या व्यवस्थापनात सुद्धा आपला पराभव झालाय. हे नक्कीच.
तिसरा मुद्दा म्हणजे
जैविक युद्ध आणि घातपाताचा प्रयत्न. तसं म्हणायला गेलं तर, ‘बिग बॉस’ व्हायला
कुणाला आवडणार नाहीये ? अगदी प्रत्येकजण आपली पदोन्नती कशी होईल ? हेच पाहत असतो.
“सारी दुनिया पर हुकुमत...बस इतनासा ख्वाब है...” अशी ओळही कुण्या गीतकारानं
लिहिली आहे. हे सारं ठीक आहे. पण, ‘बिग बॉस’ स्वताहून व्हायचं नसतं. तर या जगाकडून
देणगी म्हणून मिळणारी ती एक ओळख आहे. ‘बिग बॉस’, “मी बिग बॉस आहे” असं कधीही
कुणालाही सांगत बसत नाही. तसंही, ‘बिग बॉस’ स्वताचं किंवा इतर कुणाचंही कधीही
नुकसान करीत नाही.मग घातपात, युद्ध करून ,’बिग बॉस’ व्हायचं आहे ? की, चांगली
कार्य करून ? हे लक्षात घेणं महत्वाचं आहे.
तसंही या जगात
कुणीही, ‘बिग बॉस’ होता कामा नये. हे वाक्य सहिष्णुतेसाठी पोषक आहे. पण, तरीही
‘आपल्यापेक्षा कुणी पुढं जाता कामा नये’ ही प्रवृत्ती कशी काय जन्माला येतेय
? याचा माग काढणंही गरजेचं आहे. ‘वसुधैव
कुटुंबकम’ ही ओळ केवळ वाचण्यापुरतीच मर्यादित आहे का ? वरील तिन्ही मुद्यांचा आपण जरा साकल्यानं अभ्यास केला तर एक गोष्ट नक्कीच सापडते. ती म्हणजे आपल्या शिक्षणपद्धती मध्ये अजूनही बऱ्याच उणीवा आहेत. त्यामुळेच तर आपण अप्रगत ठरत चाललो आहोत. पहिल्या परिच्छेदाच्या अखेरच्या ओळीत लिहिल्याप्रमाणं निष्कर्ष काढला तर असे खूपच कमी विद्यार्थी आहेत की जे, आपलं उद्याचं जग अगदी खात्रीने आणि यशस्वीपणे चालवू शकतील. खूपच चिंतेची बाब आहे ही. याला पाल्य, पालक आणि शिक्षक हे तिघेही कारणीभूत आहेत. हे वेगळं सांगायला नको.
अनमोल सुतार (अन्नू)
शिवाजी विद्यापीठ,
कोल्हापूर. ©
Comments
Post a Comment