'पदोन्नती' तरीही.....

                           
                                                          'आपला माणूस' आपलं आयुष्य जीवंत ठेवण्यासाठी सतत कोणत्या ना कोणत्या तरी प्रेरणांचा वापर करीतच असतो. त्यातीलच त्याला अगम्य वाटावं अशी त्याची एक प्रेरणा म्हणजे, त्याचं पद. इतर सजीवांमध्ये पदं असतात की नाही ? हे काय मला ठाव नाही. पण, तरीही त्यांची पदं ठरविण्याचा प्रयत्न आपल्या या माणसानंच केलाय. याबाबत आज तरी कुणी अजाण राहिलेलं नाहीये.
                                                काही पदं स्थिर असतात. काही पदांवरून कुणाची गच्छंती होते. तर कुणी पदांमध्ये वरचंपद प्राप्त करण्यासाठी धडपड करीत राहतो. काहींची पदं खोटी असतात तर काहींची पदं तात्पुरती असतात. काही जणपदाचा पुरेपूर वापर करतात तर काही जण पदाचा गैरवापर करण्यात पटाईत असतात. तर या सगळ्या संशोधनात्मक वाक्यांची उदाहरणं आपल्या जगात सध्या जीवंत आहेत. म्हणूनच तर ती वाक्यं जन्माला आली आहेत. त्यामुळे प्रत्येकाची उदाहरणं सांगायला नकोत.
                                                जन्मतः लाभलेली बुद्धी आणि अनुभवांतून शिकून घेतलेल्या विचारांनी, कृतींनी साकारलेली बुद्धी यात फरक असला तरी कुणी शिक्षित असलं काय किंवा अशिक्षित. शहाणपण मात्र प्रत्येक सजीवांत असतं. मग त्याच्या वापराने चांगले परिणाम मिळतात की वाईट यावरून त्याच्या शहाणपणाचं मूल्य ठरतं. असो !
                                                तर एका प्राथमिक मराठी शाळेचे एक ओळखीचे शिक्षक जे आमच्या वडिलांचे माजी विद्यार्थी आहेत. ते परवा आमच्या घरी एका  कामासाठी आले होते. त्यांनी, त्यांच्या घराचं बांधकाम आमच्या घरापासून  जवळच्या अंतरावरच सुरू केलेलं असल्यामुळे आमच्याकडून त्यांना तात्पुरता वीज  पुरवठा पाहिजे होता. पण, ते ज्यावेळी घरी आले होते तेव्हा आमचे वडील घरी नव्हते. म्हणून मीच त्यांना म्हणालो, “वडील घरी आले की त्यांना, सुर्वे गुरुजी (आमच्या परिसरात त्यांची हीच ओळख आहे) आले होते म्हणून सांगतो आणि तुमचा निरो.....” मी पुढं बोलण्याआधीच त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हणाले, “सुर्वे सर...सुर्वे सर....सुर्वे सर आले होते म्हणून सांग....” मग मी शांत होऊन  “ठिकाय” म्हणालो आणि प्रश्नांकीत चेहर्‍याने घरात आलो.
                                                              पुढे काही दिवसांनी एका संध्याकाळी त्यांच्या शाळेतली माझ्या ओळखीची काही मुलं शाळेतून घरी येताना दिसली. तेव्हा मी त्यांना विचारलं, अरे...तुम्ही तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना काय म्हणता रे ?” यावर त्यांनी मला हसत-खेळत उत्तर दिलं, “सर आणि मॅडम....आणि आम्हाला मराठीला पाटील सर आहेत ना....त्यांचं नाव भगवान आहे पण, आम्ही त्यांना पाटील सर म्हणत नाही......” मी, “मग काय म्हणता ?” मुलं, “गॉडसर....” यावर मात्र मी चांगलाच गप्प झालो..... म्हणजे गुरुजी हा शब्द आता नक्कीच नामशेष होणार हे तर मी मान्य केलच. शिवाय भगवान नावाऐवजीगॉड याची जरा जास्तच भीती वाटली.
                                                              तर काही दिवसांनी तेच सुर्वे सर (गुरुजी) त्यांचं घर पूर्ण होईपर्यंत तात्पुरते म्हणून आमच्या घरामागे असलेल्या पाच मजली आणि अठरा सदनिकांच्या एका इमारतीत रहायला आल्याचं माझ्या निदर्शनास आलं. त्याच दिवसापासून, त्या इमारतीत जे कधी घडत नव्हतं ते घडायला सुरवात झाली. तसं ती इमारत आणि आमचं घर यामध्ये दोन्ही ठिकाणांवरचे मानवी आवाज अगदी स्पष्ट ऐकू यावेत इतकच अंतर आहे. सदनिकांच्या खिडक्या तर खोलीतली माणसं दृष्टीपथास पडावीत अशा आहेत आणि सज्जा तर मुक्तच आहे.
                                                            त्या दिवशी संध्याकाळी मी आमच्या घरच्या गच्चीवर नेहमीप्रमाणं व्यायाम करत असताना मला त्या सुर्वे सरांच्या (गुरुजींच्या) पत्नीचा आवाज त्यांच्या दिसण्यासहीत ऐकायला आला, “आहो....ही कचर्‍याची पिशवी जरा टाकून या….” तरीही मी चाहूल घेतली की, घंटागाडी कुठं दिसतेय का ? किंवा तिचा आवाज तरी कुठं  ऐकू येतोय का ? पण, माझी चाहूल निरर्थक ठरली. सुर्वे सर (गुरुजी) ती कचर्‍याची पिशवी घेऊन सज्जेत आले आणि तिथून म्हणजे,पाचव्या मजल्यावरून त्यांनी इकडे-तिकडे बघून ती पिशवी थेट खाली भिरकावून दिली. ती पिशवी खाली पडताच त्या पिशवीतून खूप असं काही बाहेर येवून विखुरलं गेलं. तेवढ्यात चार-पाच कुत्र्यांच्या एका जमावानं, ते आणखीन कसं विखुरलं जाईल याची व्यवस्था करून ठेवायला सुरवात केली. हे सगळं पाहून सुद्धा सुर्वे सर (गुरुजी) मुकाट्याने सदनिकेत निघून गेले. त्यांच्या सोबत त्यांचा दहा वर्षांचा एक मुलगाही, त्या कचर्‍याचं कुत्र्यांकडून चाललेलं पोस्टमार्टम पाहत गमतीने हसत त्या सज्जेत उभा होता.तेवढ्यात सुर्वे सरांनी (गुरुजींनी) त्याला दटावून आत बोलावून घेतलं.
                                                       दुसर्‍या दिवसापासून तर त्या इमारतीतल्या आणखीन काही वास्तव्यकरांनी त्या सुर्वे सरां (गुरुजीं) प्रमाणं कचर्‍याची पिशवी भिरकवायला सुरवात केली. खोल्यांतला साधा कचरा सुद्धा छोट्या केरसुणीतून हवेत तरंगू लागला. सार्‍यांना बराच वेळा सांगून पाहतोय पण, “येरे माझ्या मागल्या” चा पुन्हा-पुन्हा प्रत्यय येवू लागलाय.
                                                       आता तर अठरापैकी दहा जणांनी, हे कचरा भिरकावणं सुरू केलय. हे प्रमाण वाढेल की कमी होईल ? हे सांगता येत नाहीये. हे प्रमाण पहिलं तर (सर आपल्या लेखी शैलीसारखं) स्वच्छ-भारत हे वाक्य नुस्तचशायनिंग मारतय. ते सत्यात उतरलय यावर अजिबात विश्वास बसत नाही. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे वडील त्यांना सतत सांगत, “बाळ आबुल....आपल्या शिक्षणाला आपल्या शहाणपणाची जोड असेल तर आपलं आयुष्य सहज सुंदर होऊन जातं....”
                                                         जागतिक स्वच्छता दिनाच्या दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रातल्या छायाचित्रात स्वच्छता करताना पुढे-पुढे दिसणारे आणि गुरुजी या पदाची लाज वाटते म्हणून सर हे आपलं प्रमोशन स्वताच करणारे ते सुर्वे सर (गुरुजी) म्हणजे हेच का ? यावर आता विश्वास बसेनासा झालाय. शिक्षकांची ही तर्‍हा आहे तर, त्यांच्याकडून घडणारे विद्यार्थी कशा प्रकारे विश्वासू ठरतील ? ह्या असल्या सुशिक्षितांपेक्षा आपले अनुभव आणि आपलं शहाणपण यांना जोपासून जगणारे अशिक्षितच सुंदर म्हणायचे......  
- अनमोल सुतार (कवि अन्नू) ©
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.                   

Comments

Popular posts from this blog

जागतिक स्वच्छता दिन २ ० २ ५ .

'द व्हिलन' - 'तो' ही आणि 'ती' ही.

अंधार जेव्हा होई प्रकाशाचा वैरी