'साकारती अंकुर जेव्हा....'
प्रश्न तयार झाले की, त्यावर उत्तरं तयार करावी लागतात. तरीही, हा खेळ समकाळानुसार पुन्हा-पुन्हा सुरूच राहतो. याला, शोध किंवा संशोधन म्हणायला काहीच हरकत नसावी. मुळात, प्रश्न सगळ्यांनाच सापडतात. पण, त्यांची उत्तरं मात्र सगळ्यांनाच सापडतील असं होत नाही. मग उरतात केवळ दोनच विकल्प. एक तर दुर्लक्ष आणि दूसरा विकल्प म्हणजे, काहीही व्यक्त करून मोकळं होणं. पण, प्रश्न विचारणारे लहानगे असतील तर ? तर, असे खूपच कमी पालक आहेत की, जे आपल्या कौशल्याने आपल्या पाल्याच्या प्रश्नांना सन्मुख ठेवतात ; आणि बाकीचे पालक, एक तर दुर्लक्ष किंवा काहीही उत्तर देवून मोकळं होणं पसंद करतात. आपल्या पाल्याच्या प्रश्नांना सन्मुख ठेवणारे पालक, आपल्या पाल्याशी असलेलं आपलं नातं आयुष्यभर चिरतरुण ठेवतात.या नात्यात मानसिक आणि शारीरिक बदल यांची परस्पर संवादातून योग्य अशी दखल घेतली जात असते. वयोनुरूपतेमध्ये अगदी मनाजोगतं साकार होणारं असं सारं काही असलं तरीही, मार्गदर्शक हवाच. या तत्वाला अनुसरून हे नातं चालत राहतं ; आणि जे पालक आपल्या पाल्यप्रश्नांकडे दुर्लक्ष करतात किंवा काहीही उत्तर देवून मोकळे होतात त्यांचे पाल्य दिशाहीन होण्याचा संभव अधिक असतो. पुढे भविष्यात यदा-कदाचित त्या पाल्याला जेव्हा त्या प्रश्नांची सत्यता कळते तेव्हा आपल्या पालकांसोबत असलेलं त्यांचं नातं धूसर व्हायला अजिबात वेळ लागत नाही.
निसर्ग जेव्हा एखाद्या जीवाला या पृथ्वीतलावर जन्म देतो तेव्हा सारीच सृष्टी त्या जीवाला अगदी नवीन-नवीन भासते. उत्सुकता, आकलन आणि वाटणार्या भीतीपासून संरक्षण. ह्या गोष्टी नवजात शिशुमध्ये जन्मजातच असतात. मग, या जन्मजात गोष्टींना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सर्वस्वी कुणाची ? तर त्याच शिशूच्या पालकांची. पण, हेच मार्गदर्शन करण्यासाठी कंटाळा का केला जातो ? टाळाटाळ का होते ? त्याला दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित का ठेवलं जातं ? किंवा काहीही सांगून वेळ मारून का नेली जाते ? या अशा प्रश्नांकडे आपण जरा जबादारीनं पहायला शिकलं पाहिजे.
उत्सुकतेतून आकलन करून घेणं आणि स्वताला जोपासत आयुष्याची जडण-घडण होऊ देणं हा त्या लहान मुलांचा त्यांच्या परिपक्वतेच्या दिशेनं संक्रमण करणारा एक सुंदर असा प्रवास असतो. आताच्या युगातली मुलं त्यांच्या वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत नक्कीच आणि सहज परिपक्व होतात. यापुढचं त्यांचं आयुष्य जगण्याचं बळ जर त्यांना द्यायचं असेल तर किमान त्या पंचवीस वर्षात त्याच्या पालकांनी त्याला तसं जबाबदारीपूर्वक मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे. याबाबत पालकांनी चिंताधारक, तक्रारग्रस्त असणं योग्य नव्हे. आपलं वय हेच आपल्या पाल्याचं वय नाही. हे समजून घ्यायला हवय. हां ! शिस्त लागण्यासाठी किंवा काय वाईट-काय चांगलं ? ते कधी ? केव्हा ? कुठे ? कसं ? काय ? किती ? कुणासोबत ? का ? आयुष्याची पारंपरिक-आधुनिक मूल्ये, तत्व यांसाठी किंवा नैसर्गिक आणि भौतिक यांमध्ये संतुलन साधण्यासाठी, योग्य संस्कारांसाठी, आरोग्यदायी असण्यासाठी शक्य तो धाक ठेवणं योग्य आहे. त्यात वाद नाहीच. पण, त्या धाकाचा अतिरेक होता कामा नये हेही विधान वादग्रस्त ठरत नाही. समजून घ्यायची कुवत असेल तर समजविण्याचं कौशल्य आपोआपच हस्तगत करता येतं.
पाल्याच्या आवडी-निवडी जोपासणं हेही एक महत्वाचं उदधिष्ठ असावं. त्यात, रम्यता आणि विकास यांना अग्रक्रमावर ठेवणं उचित राहील. विधायक गोष्टीतून हे सारं साध्य होणार असेल तर काळ कोणताही असो. त्यात काही फरक पडत नाही. पुस्तक असो वा मोबाइल. पण, त्यांचा अतिरेक मात्र नको. हे लक्षात घ्यायला हवय. सहिष्णुतेचं तत्व अंगीकारून आपल्या समकाळात तिन्ही काळांचं ज्ञान असणंही श्रेयस्कर ठरू शकतं. हे समजून घ्यायला हवं. आपण जसे माणूस आहोत तसे तेही माणूस म्हणूनच जगत आहेत. याचं भान हवं. तात्पर्य, सर्वांनीच योग्य नागरिक असणं केव्हाही चांगलं असतं.
'शाळा सुटली-पाटी फुटली' अशी अवस्था व्हायला नको असेल तर पाल्याच्या संबंधित असलेल्या सर्वांनीच त्याच्या परिपक्वतेच्या जबाबदारीचा विडा उचलायला हवा. त्यामुळेच तर पालकांच्या भवितव्याच्या आधाराचा विडा त्यांचे पाल्य ऊचलू शकतील.
'संजय जाधव' दिग्दर्शित, 'खारी-बिस्किट' या मराठी चित्रपटात भाऊ असलेला बिस्किटच केवळ आपल्या बहिणीची अर्थात, खारीची जबाबदारी घेतो. बिस्किट, जसा एका गाण्यातून खारीपाशी व्यक्त होतो तसं, पाल्याच्या सर्व संबंधितांनीही त्या पाल्याला म्हंटलं पाहिजे.
"कधी हसणार आहे, कधी रडणार आहे.
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे.
तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे
मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे "
या अर्थाची उक्ती पाल्य-पालकांमध्ये देवाण-घेवाण होऊन वारसाधीष्ठित राहिली पाहिजे. सुख-दुख प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. तरीही, 'फूल उमलू द्यावं, आपण त्याच्या पाकळ्या ओढू नयेत' याची प्रचिती पालकांनी खरी ठरवायलाच हवी. कारण,पाल्याचे पहिले गुरु पालकच असतात. हीच ठरेल सूर्याची एक ऊर्जा, चंद्राची एक शीतलता आणि तारकांची अगम्य अशी तेजस्विता.
© अनमोल सुतार (कवि अन्नू)
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
Comments
Post a Comment