नव्या क्षितिजाच्या दिशेनं....
काळ बदलत राहणं आणि सतत अतूटपणे पुढे सरकत ठेवणं ही आपल्या सृष्टीची अविरत अशी प्रक्रिया आहे. प्रत्येक सजीवाने आपल्याला लाभलेल्या काळात आपलं आयुष्य व्यतीत करणं म्हणजे त्या सजीवाचा तो समकाळ मानावा लागेल. शोध लागले की जुन्या गोष्टी कालबाह्य होणं अपरीहार्य असतं. तसं ही जुन्या गोष्टी जरा जरी त्रासदायक ठरायला लागल्या की नव्या गोष्टी अंमलात आणून ठेवणं हेही अटळच असतं.
आपल्या केंद्र सरकारनं खुल्या केलेल्या बहू प्रतिक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या मसुद्यावर मला काही मतं अभिव्यक्त करावीशी वाटत आहेत. ती मतं, मी अभिप्राय दाखल या लेखात मांडतो आहे.
मुद्दा (अ)
५ + ३ + ३ + ४ असा आकृतीबंध मान्य झाल्यामुळे व्यक्तिगत प्रगतीला नक्कीच एक यथार्थ असा वेग प्राप्त व्हायला मदत होणार आहे. ज्ञानाची उपलब्धता आता सहज असली तरी शारीरिक दृष्ट्या वयोनुरूप ज्ञान प्राप्ती, वरील आकृती बंधातून साध्य होवू शकेल. तरीही, अवांतर ज्ञानाचं आत्मसातीकरण एखाद्या विद्यार्थ्यानं करून घेतलं तरी त्याचा पाया हा केवळ वरील आकृती बंधानुसारच रचला जाणार आहे. अधोगती नक्कीच टळेल. यात शंका नाही. तसच उत्साही संप्रेरकांनाही उचित असं संतुलन साधता येईल. वेळ आणि कार्यप्रणाली यांचा अचूक मेळ अनुभवता येईल. नैसर्गिक आणि भौतिक यांची सांगड घालून आयुष्य व्यतीत करणं हा शिक्षणाचा मूळ हेतु असावा असं मला वाटतं. तरीही, यात कुणी अयशस्वी ठरत असेल तर, तो ज्याच्या-त्याच्या जबाबदारीचा, कर्तव्याचा भाग असावा. अंगणवाड्या आणि बालवाड्या आता शाळांचाच भाग होणार असल्यामुळे त्यांच्या विषयी काहीच त्रुटी उरणार नाहीत.
मुद्दा (ब)
पाठय पुस्तकं आणि त्यातला अभ्यास क्रम ठरवताना ताण आणि दबाव प्रस्थापित होणार नाही हे लक्षात घेवून मूल्यधिष्ठित अशी वैज्ञानिक, तर्कशुद्ध, चिकित्सक आणि सर्जनशील यांच्याशी घातलेली सांगड नक्कीच यथायोग्य ठरेल. यामध्ये विद्यार्थ्यांची एकाग्रता यावर भर देण्यापेक्षा त्याची आवड, त्याची रम्यता यांवर लक्ष ठेवणं हिताचं होईल. हसत-खेळत शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्यातून सदैव सर्वांगीण विकासाचं तात्पर्य पुन्हा-पुन्हा अधोरेखित होत राहील. म्हणूनच शिकण्याची आणि शिकविण्याची जागृती आपलं दर्शन सहजपणे देत राहील. साक्षरता एकदा का प्राप्त झाली की, उपक्रम आपोआपच सोप्पे होवून जातील. अति-सुलभता आणून केवळ आनंदच देण्यापेक्षा आव्हानात्मकताही असायला हवी. त्यामुळे जबाबदारी आणि संयमी, चिकाटी ची वृत्ती सुद्धा अंकुरित होईल.
मुद्दा (क)
कोणत्याही विषयाची निवड करणं आणि सर्वच विषयांना सारखं महत्व असणं म्हणजे, जे विषय आहेत त्या प्रत्येक विषयांत प्रत्येकाची गुणवत्ता आणि प्रत्येकाचं कौशल्य आपल्याला पाहता येईल. यांमुळे विविधता आणि सहिष्णुता यांचा आपल्याला प्रत्यय येत राहील. तसच आधुनिकता आणि परंपरा यांमध्ये सुद्धा समन्वय साधणं शक्य होईल. पण, नावडतीचा विषय पूर्णता हद्दपार करून चालणार नाही. याची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे. डिजिटल विश्वाचा वापर याबद्दल जरी मार्गदर्शन होणार असलं तरी सुरक्षा दुर्लक्षित तर होणार नाही ना ? हे पाहणं ही आव्हानात्मक असणार आहे.
मुद्दा (ड)
भाषा निवडीचं स्वातंत्र्य हे पूर्णता पाल्य आणि पालकांकडेच असावं. तसच बोलीभाषा, प्रादेशिक आणि जागतिक भाषा यांचा समावेश शिक्षणक्रमात केलेला असावा.
मुद्दा (इ)
मूल्यमापन आणि परीक्षा यांमध्येही उचित असा बदल केला असला
तरी विद्यार्थ्यांच्या अपयश-यशाची कारणीमीमांसा त्या विद्यार्थ्याला समजणं महत्वाचं ठरेल.
मुद्दा (ई)
या उपक्रमांना राबविण्यासाठी सुरवातीला साहित्य आणि तशी व्यवस्थापनीय प्रणाली उपलब्ध असणं अनिवार्य आहे. दुरूस्ती आणि देखभाल यांचंही व्यवस्थापन उचित असावं. समूह पद्धत असल्यामुळे शिक्षणाचा लाभ संपूर्ण समाजासोबत घेता येईल आणि प्रत्येकालाच काळासोबत सहिष्णुता लेवून सजग राहता येईल. पण, याचा अतिरेक होऊ नये. हेही पाहणं योग्य ठरेल.
मुद्दा (उ)
पाल्याला घडविण्यात ज्या प्रमाणं या मुद्द्यांचा उपयोग होणार आहे त्याच प्रमाणं सुरवातीला पालक आणि शिक्षक यांना तसं प्रशिक्षण देणं महत्वाचं असणार आहे. सातत्य आणि प्रगती यांना मनापासून स्थान द्यावं लागेल.
उद्याच्या भारताचा भविष्यकाळ हा जडण-घडण करणारा ठरणारा असला तरी ही शक्यता अगम्यतेतून दुर्दम्य होता कामा नये अशीच एक आशा.
अनमोल सुतार (कवि अन्नू)
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
© सकाळ-सप्तरंग
अभिप्राय - डॉ. वसंत काळपांडे.
Comments
Post a Comment